भिवंडी : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा बेकायदेशीर ‘मटका’ जुगार अड्डे सुरु होऊन त्यामध्ये वाढ झाल्याने या परिसरात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. या पूर्वी पोलिसांच्या कारवाईमुळे बंद पडलेले जुगाराचे अड्डे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आणि स्थानिक महिलांनी पुढाकार घेत एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि या अवैध धंद्याचे संपूर्ण पितळ उघडे पाडले.
भिवंडी शहर आणि परिसरात गांजा,मटका,हुक्का,गुटका आणि एमडी पावडर आदि नशेच्या पदार्थांचा सुळसुळाट झाला असून या सर्व नशेमध्ये तरुणपिढी बरबाद होत आहे. या प्रकरणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्याची मागणी केली होती. परंतु सध्या त्यांच्याच मतदार संघात जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागात मोठ्या संख्येने कामगारवर्ग राहत आहेत. तसेच झोपडपट्टीची मोठी संख्या आहे. ‘मटका’ जुगाराच्या वाढत्या प्राबल्याबाबत बऱ्याच काळापासून तक्रारी येत होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी बुरखाधारी महिलांचा एक गट आपला निषेध नोंदवण्यासाठी थेट जुगार अड्ड्यावर चालून गेला, तेव्हा खरी परिस्थितीचा जनतेसमोर उघड झाली. तसेच घटने दरम्यान संपूर्ण प्रकाराचे चित्रण करणारा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. परिणामी स्थानिक पोलीस चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
सदर आंदोलक महिलांचा आरोप आहे की, जुगाराच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. त्यांनी सांगितले की, परिसरातील अनेक पुरुष आपली संपूर्ण महिन्याची कमाई या अड्ड्यांवर उधळून टाकतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. शिवाय, या जुगार अड्ड्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांचे व्यसनी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे; ज्यामुळे महिला आणि तरुणींची सुरक्षा व सुरक्षितता धोक्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीवर आरोप करताना महिलांनी दावा केला की, जेव्हा जेव्हा त्या तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा जुगार चालक त्यांना धमक्या देतात आणि “तुमच्या नवऱ्याला पाठवा, आम्ही त्याला बघून घेऊ,” असे म्हणून त्यांची खिल्ली उडवतात. यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर, महिलांनी शांतीनगर पोलीस आणि भिवंडीचे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर या अड्ड्यांवर लवकरच कारवाई केली गेली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरांमधील बेकायदेशीर कृत्ये आणि त्यांना मिळत असलेल्या कथित आश्रयाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या संदर्भात पोलीस आणि प्रशासनाची भूमिका काय असते, आणि जुगार माफियाला खरोखरच वठणीवर आणणे शक्य होते का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

