भिवंडी,ता. १ (बातमीदार) : भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढत्या समस्या असताना,त्याचे निराकरण करण्यासाठी मनपाकडे वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत पालिकेच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या वसुलीकडे पालिकेचा अनेक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर अंतर्गत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे,असा आरोप शहरातील समाजसेवी नागरिकांकडून केला जात असून गेल्या काही महिन्यापासून महापालिकेच्या उत्पन्नात घट दिसून आल्याने मनपाच्या प्रभारी मार्केट अधिकाऱ्याला मनपा सेवेतून निलंबित करावे,अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना नागरिकांनी लेखी पत्र दिले आहे.
शहरातील नागरिकांकडून आलेल्या तकारी नुसार व मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने शहरातील मार्केटमधील कर वसुलीसाठी ठेकेदार नेमले असतांना प्रत्येक दिवसाला सुमारे ८० ते ९० हजार रूपये भिवंडी महापालिकेच्या तिजोरीत जमा करीत होते. त्यामुळे मनपाला मासिक लाखो रूपये उत्पन्न मिळत होते. ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर व मार्केट विभागात प्रभारी मार्केट अधिकारी स्नेहल पुण्यार्थी यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रत्येक दिवसाचा सुमारे २० ते ३० हजार रूपये भरणा केला जात आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम ५० मे ८० हजार रूपयांचा भ्रष्टाचार होत आहे. तसेच परवाना विभागाचा मागील वर्षामध्ये १.५० कोटी मनपा फंडात जमा करण्यात आले होते. परंतु स्नेहल पुण्यार्थी परवाना विभागात आल्यापासुन फक्त दिवसाला २० ते ३० हजार रूपये भरणा होत आहे. त्यामुळे मनपाचे फार मोठे आर्थिक नुकसान आहे.

सध्या भिवंडी महानगरपालिकेचा परवाना, जाहीरात, मार्केट व मिळकत या चार विभागाचा प्रभारी कार्यभार स्नेहल पुण्यार्थी यांना दिलेला आहे. स्नेहल पुण्यार्थी हे मनपामध्ये अनुकम्पा तत्वावर कामावर लागलेले आहेत. त्याची मुळ पोस्टींग लिपीक आहे. व शैक्षणिक पात्रता १२ वी पर्यंत आहे. तसेच त्यांना मनपाच्या विभाग प्रमुख पदाचा कोणत्याही पदाचा अनुभव नसतांना व तसेच त्यांची सेवा जेष्ठता नसतांना देखील त्यांना
परवाना, जाहीरात, मार्केट व मिळकत या चार विभागाचा प्रभारी कार्यभार दिलेला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर असताना , उत्पन्नाचे साधन असलेले चार विभाग विभाग अशाप्रकारे एकाच लिपिकाकडे सोपविणे, या बाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान चारही विभागातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ११ जुन २०२५ पासुन आजपर्यंत त्यांच्या काळात भिवंडी मनपाचे उत्पन्न ८० ते ९० लाख रुपयांनी कमी झाले असून या मध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना तातडीने मनपा सेवेतुन निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भीम शक्तीचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश नाथा म्हस्के यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांच्याकडे केली आहे.

