भिवंडी २७ : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील भव्य पटांगणात रविवारी सकाळी ८-१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रसंगी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय पां. जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, उपाध्यक्षा अरुणा प्रकाश जाधव, श्रीराम नागो भोईर, सरचिटणीस रोहित वि. जाधव आणि मुख्याद्यापक सुधीर देवराम घागस आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
शहरातील धामणकर नाका येथे असलेल्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात झेंडावंदनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून सांगितले कि, आज आपला देश पुढे जात आहे. प्रगती करीत आहे. जगात देशाची प्रतिष्ठा वाढत आहे. अर्थव्यवस्थाची शक्ती वाढत आहे. हि प्रतिष्ठा आणि सर्व सुखे आणि आनंद उपभोगत असताना या देशाला घडविण्यासाठी अनेकांनी आपले जीवन समर्पण करून देशाला उभे केले आहे. देश पुढे जात असताना जगाचे लक्ष देखील आपल्याकडे आहे. त्यामुळे असा गौरवशाली भारत बनविण्याचे दायित्व स्वभाविकपणे आमच्या सर्वांचे आहे. प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करताना या दायित्वाची आठवण करण्याचा हा दिवस आहे. देशाचा गणराज्य दिवस असल्याने हे दायित्व देशातील सर्वानी स्वीकारले पाहिजे. आपल्या सार्वभौमत्वचे प्रतीक असलेला तिरंगा आपण फडकावीत असतो. त्या तिरंग्यात त्याग,भक्ती,ज्ञान,समृद्धी व समर्पण आहे. या झेंड्याला वंदन करताना शुद्धाशील व शुद्धचरित्रवान बनून भक्ती ज्ञानपूर्वक आम्हाला कर्म करावे लागेल,हा ध्वजारोहणाचा संदेश आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत आम्हाला संविधान देताना बंधुभाव हाच धर्म असल्याचे सांगितले आहे. जगण्यात प्रकृतीत विविधता असली तरी आपसात आत्मीयतेने राहिले पाहिजे. बंधुभाव व सद्भावनेने आपसात व्यवहार केले पाहिजेत. देश मोठा होतो तेंव्हा आपल्याला देखील प्रतिष्ठा मिळते. हि प्रतिष्ठा देशाबाहेर असलेल्या भारतीयाना देखील मिळते, असे भागवत यांनी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाची दखल घेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे कौतुक करून हि नवी पिढी आमच्या पुढे जाऊन भारताला मोठी बनवेल. यासाठी स्वतः सर्वांनी यश प्राप्त करा त्या यशाचा उपयोग देशासाठी व जगासाठी करून आपल्या पाशवी जीवनास सार्थक बनवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ प्रवेशिका धारकांना प्रवेश देण्यात आला होता. नियोजित कार्यक्रम वेळेत सुरु होणार असल्याने या ठिकाणी उशिरा गेलेल्या नागरिकांना पोलिसांनी प्रवेश नाकारला.

