भिवंडीत जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन साजरा

भिवंडी


भिवंडी,ता.२३ (वार्ताहर) : जेष्ठ नागरिक संघ भिवंडी सेंट्रलचा पंधरावा वर्धापनदिन कोंबडपाडा येथील पार्वती मंगल कार्यालयात उत्साहात व आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्व जेष्ठ नागरिकांसह ७० ते ९६ वर्षापर्यंतचे जेष्ठ नागरिक देखील उपस्थित होते. तर झी मराठीच्या सारेगम लिटिल चॅम्प या कार्यक्रमात भिवंडीतील बालगायीका कु.ऋचा घांग्रेकर हीचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत सोनटक्के यांनी केलेल्या प्रस्तावनेत संघाचा १५ वर्षाचा आढावा घेत लेखाजोखा मांडला. या प्रसंगी उपस्थित असलेले भिवंडी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी केलेल्या भाषणात सांगितले कि, मोबाईलमुळे तरुणवर्ग जेष्ठापासून लांब जात असल्याचे चित्र समाजात दिसते. मात्र माझी जडण-घडण आईवडिलांमुळे झाली आहे. त्यांच्या संस्कारातून मला दिशा मिळाली. आईवडिलांच्या पुण्याईने समाज घडतो. विनम्रता व आदर नसेल तर तो व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे मुलांवर आईवडिलांचे संस्कार महत्वाचे आहे. या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक कृष्णा राजय्या गाजेंगी, शिवसेना (उबाठा)चे विधानसभा संघटक उमेश सुरेश कोंडलेकर,माजी नगरसेवक महेंद्र देहरकर जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा नीलम कालगावकर, सचिव सदानंद पिंपळे,खजिनदार नंदलाल परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी तसेच झी मराठीवर सारेगम लिटिल चॅम्पची गायिका व व्हायरल क्विंन कु.ऋचा घांग्रेकर हीचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा गाजेंगी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या संघाचा पाया रचणारे नंदकुमार पुरषोत्तम मुंढे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघामार्फत ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा आणि लग्नाला ५० वर्षे झालेल्या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका घांग्रेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटील यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात हा समारंभ संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *