महापालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार? जाब विचारीत राकाँपा शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांचे आंदोलन

ठाणे भिवंडी महारष्ट्र राजकीय
भिवंडी : भिवंडीतील जनतेवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. शहरातील खड्डेमय रस्ते, रेयान एंटरप्रायझेस कंपनीमुळे अडचणीत सापडलेल्या लघु व्यापाऱ्यांच्या समस्या तसेच कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू होऊनही दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) भिवंडी शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका मुख्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
                           प्रवीण पाटील यांनी सांगितले की, महानगरपालिका प्रशासन जनतेच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी भरले असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. रेयान एंटरप्राइझ कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक लघु व्यापाऱ्यांचा व्यवसाय प्रभावित झाला आहे. मात्र त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नाही. तसेच कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू होऊनही दोषी अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध कारवाई न होणे ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. या सर्व प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका मुख्यालयात धडक देत आयुक्त अनमोल सागर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या कार्यालयाला प्रतीकात्मक कुलूप लावून निषेध व्यक्त केला. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.
                         त्यानंतर प्रवीण पाटील यांनी महापौर कार्यालयात भेट दिली. महापौर नारायण चौधरी अनुपस्थित असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधत शहरातील ज्वलंत प्रश्नांची माहिती दिली आणि कोहिनूर दुर्घटनेस जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जनतेच्या सुरक्षिततेशी आणि शहराच्या विकासाशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेतील आंदोलनानंतर प्रवीण पाटील यांनी भिवंडी काँग्रेस कार्यालयात जाऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी सुमित्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला. कोणत्याही महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचविणारी भाषा लोकशाही संस्कृतीला शोभणारी नाही. सार्वजनिक जीवनात महिलांचा सन्मान राखणे आणि मर्यादित भाषेचा वापर करणे ही सर्व राजकीय पक्ष व नेत्यांची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले.
                प्रवीण पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत राहील. शहरातील समस्यांचे तातडीने निराकरण झाले नाही आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर पक्ष जनतेला सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारेल. त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असेल. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे पदाधिकारी अरुबा अंकम, सिद्धार्थ गोरे, शमीम अन्सारी, रजीत वालिया, महेश येमुल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *