भिवंडी दि.३ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बांधलेल्या भव्य स्व.परशुराम धोंडू टावरे स्टेडियम मध्ये स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरली असून या स्टेडियम मधील मैदानांवर करमणुकीचे साधने उपलब्ध करून क्रीडास्पर्धा ऐवजी करमणूक आणि मनोरंजनाचा बाजार मांडल्याने शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडी महानगरपालिकेने मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याऐवजी बुद्धिबळासारखे चार भिंतीतील खेळांचे आयोजन केले जाते. स्व.परशराम टावरे स्टेडियम मधील मैदानात मोठ्या क्रिकेटसह इतर छोटेखानी मैदानी खेळांच्या स्पर्धा होत नसल्याने या मैदानांवर राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि लग्नसमारंभ सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. इतर वेळी या मैदानांचा वापर सायंकाळच्या वेळेस परिसरातील गर्दुले आणि अमली पदार्थांचे सेवन करणारे नशेबाज करीत असतात. यावर अनेकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र पालिकेकडून रखवालदार नेमले जात नाही तो पर्यंत या मैदानाचा गैरवापर सुरु राहणार आहे. या मैदानाच्या कंपाऊंडमध्ये मनपा प्रभाग समिती ४ चे कार्यालय असून येथे अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालयीन वेळेत रहदारी असते. मात्र त्यानंतर गैरवापर सुरु होतो,अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
स्व.परशराम टावरे स्टेडिअममधील मैदानावर पाच दिवसांसाठी करमणुकीची साधने असलेल्या मीना बाजार जत्रा भरविण्यासाठी मनपाच्या प्रभाग समिती क्र.४ चे प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांनी दिल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. मागील वर्षी शहरातून नागरिकांचा विरोध झाला होता. त्या प्रमाणे यावर्षी देखील परवानगी दिल्याने हा मीना बाजार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली हि परवानगी दिली जात असल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली. मात्र अशा करमणुकीच्या बाजारामुळे मैदानाची नासधूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे शहरातील क्रीडापटूंसाठी असलेल्या टावरे क्रिकेट स्टेडियमवर ही जत्रा गेल्या वर्षापासून सुरु झाली असून गेल्या वर्षी क्रिकेटपटूंसह क्रीडा प्रेमींनी या मीना बाजाराच्या आयोजनाबाबत मनपा प्रशासनावर तीव्र ताशेरे ओढले होते.मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनपा प्रशासनाने मीना बाजार जत्रेला परवानगी दिली असल्याने येथे पाळणे खेळणी व इतर साहित्याची जुळणी आणि उभारणी सुरू झाली आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिका प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या या क्रिकेट मैदानाकडे मनपा प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झाले असून खेळाडूंना खेळण्यासाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नसल्याने खेळाडूंमध्ये नेहमीच नाराजी असते. आता महापालिका प्रशासनाने ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर असे ५ दिवस या ठिकाणी मीना बाजार या जत्रेला परवानगी दिली आहे. या जत्रेत परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार असून खेळण्याची दुकाने तसेच आकाश पाळणे या ठिकाणी लावण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.त्यामुळे मोठं मोठे पाळणे उभारण्यासाठी मैदानाचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र खेळाच्या मैदानावर अशा प्रकारे महापालिका प्रशासन जत्रेसाठी परवानगी कशी देते ? असा सवाल शहरातील नागरिक विचारत आहेत.

——————————————————————————————————-
स्व. परशराम टावरे स्टेडिअम हे प्रभाग समिती ४ च्या कार्यक्षेत्रात येते. त्या मध्ये मीनाबाजार जत्रा लावण्यासाठी आमच्याकडून परवानगी देण्यात आली आहे.
सुनील भोईर, प्रभारी सहा.आयुक्त
प्रभाग समिती क्र.४

———————————————————————————————————————————-
शहरातील खेळाडूंसाठी बनविलेल्या स्व. परशराम टावरे स्टेडियम मध्ये मीना बाजार करमणुकीची जत्रा भरविल्या बाबतच्या माहितीसाठी फाईल प्रभाग समिती ४ मधून मागवून घेतो.तसेच माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
अजय वैद्य,आयुक्त
भिवंडी महानगरपालिका
————————————————————————————————————————————–

