वाहन चालकांनो सावधान भिवंडीत लवकरच तिसरा डोळा टिपणार बेशिस्त वाहन चालकांना

ठाणे भिवंडी सामाजिक
भिवंडी : गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरांतर्गत सरकारी व मनपा परिवहन प्रवासी सेवा नसल्याने शहरात मोठ्या संख्येने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे.त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेकवेळा वाहनचालकांना आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर अंकुश आणण्यासाठी आता ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत भिवंडी शहरात वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वहतुकीच्या मुख्य मार्गावर व्हिडीओ कॅमेरे लावणार आहेत.या माहितीनंतर शहरातील बेशिस्त वाहन चालकांमध्ये खळबळ माजली आहे.
              शहरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर नेहमी रिक्षा रेंगाळत असल्याने त्यांच्या समुहाने ठिकठिकाणी रस्ता अडविलेला दिसून येतो.तर अनेकदा रिक्षाचालक आणि दुचाकी चालक वहातूकीचे नियम तोडून वाहने हाकताना दिसतात.त्यामुळे अनेकदा ठिकठिकाणी वहातूक कोंडी होते.तर बऱ्याचदा चोरीची दुचाकी आणि तीन चाकी वहाने रस्त्यावर फिरत असतात.त्यांची तपासणी होत नसल्याने नल्ला रिक्षा राजरोसपणे व्यवसाय करतात.तर चोरीच्या दुचाकी पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून जलद गतीने पळवितात.
           त्याच प्रमाणे शहरातील अनेक चारचाकी वाहनांनी अवैधरित्या काळ्याकुट्ट काचा लावल्या आहेत.तर काहींनी अशा काचा लावून पुढे पदाधिकारी असल्याच्या पाट्या लावल्याने पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत नाही.अशी वहाने आता कॅमेरात कैद होणार आहेत.तर अनाधिकृत पार्किंग आणि नो एन्ट्री मध्ये घुसणारे वाहन चालक देखील कॅमेरा मध्ये दिसणार आहेत.तसेच शहराबाहेरून येणारे जड-अवजड वहानांवर देखील या माध्यमातून कारवाई होणार आहे. अशा सर्व कारवाई मुळे शहरातील आणि शहराबाहेरील वाहनचालकांना शिस्त लागणार असून वहातूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.तसेच मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी पासून वाहनचालकांची आणि नागरिकांची सुटका होणार आहे.
———————+++———————————-
भिवंडीत होणारी वहातूक कोंडी आणि अनेक वाहन चालकांमध्ये असलेला वहातूक शिस्तीचा अभाव,त्याच प्रमाणे वहातूक पोलिसांची कमतरता यामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी भिवंडीत कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारे विवीध शहरात कॅमेरा लावण्यात येणार आहे.भिवंडीत कॅमेरा लावण्यासाठी शहरातील विविध मार्गांचा आणि चौकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
काही महत्वाच्या ठिकाणी मनपाची परवानगी देखील घेण्यात येणार आहे.
                         शरद ओहोळ,सहा.पोलिस आयुक्त
                            भिवंडी वहातूक विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *