महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा

ठाणे भिवंडी महारष्ट्र

भिवंडी : शहरातील दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या महानगर प्रेस असोशिएशन ऑफ भिवंडी या संस्थेच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी महानगरपालिका उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. दिनेश्वर पाटील,पालिका लेखाधिकारी शैलेश दोंदे,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,संस्थाध्यक्ष संजय भोईर,पंढरीनाथ कुंभार,शरद भसाळे, संतोष चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकारांना दैनंदिन वृत्त संकलनाचे काम करताना येत असलेल्या अडचणींचा आढावा घेत,पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम व विमा उतरवण्यात येणार असून नियमित आरोग्य तपासणी करून पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला. भिवंडीतील सर्व पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्का सोबतच त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय प्रसंगी एकजूट दाखवण्यासाठी सर्वजण एकत्र आल्याचे मत आपल्या प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष संजय भोईर यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी भिवंडीतील समस्या मांडत असतानाच त्याच्या सोडवणुकीसाठी पत्रकार मंडळी पुढाकार घेत असल्याने त्यांच्या कामाचा प्रशासन यंत्रणेला नेहमीचा आधार होत असतो असे सांगितले.तर शहरात पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार भवन महापालिकेच्या वतीने करण्यासाठी मनपा प्रशासन आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी मनपा उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव पत्रकार नितीन पंडित यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *