नववर्षारंभात भिवंडी महानगरपालिकेचे सर्वंकष महास्वच्छता अभियान 

भिवंडी महारष्ट्र

भिवंडी शहर स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर

 पंढरीनाथ कुंभार 

भिवंडी,ता.०१ :  आजपासून २०२४ या नव्या वर्षास आरंभ होत आहे. या निमित्ताने शहरातील मुख्य समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय विलास वैद्य यांनी सर्वंकष महास्वच्छता अभियान सुरु केले असून त्यासाठी आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून शहर स्वच्छतेला सुरुवात केली आणि नागरिकांनी देखील आपले शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊन पालिकेला सहकार्य करावे असा संदेश दिला.  

, सध्या राज्यासह देशभर स्वच्छता अभियान राबवण्याचे वेध लागले असताना भिवंडीत महानगरपालिका प्रशासना तर्फे पाच प्रभाग समिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या सर्वंकष महास्वच्छता अभियान (डीप क्लीन ड्राईव्ह) चा शुभारंभ मनपा प्रभाग क्र.१ च्या कार्यक्षेत्रातील एस.टी.स्थानक ते नागाव या रस्त्यावर आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त विठ्ठल ठाके,संजय हिरवाडे,उपायुक्त दीपक झिंजाड, प्रणाली घोंगे यांसह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले. या वेळी स्वच्छता झालेल्या रस्त्यावर रस्ते दुभाजक व रस्ते हे पाण्याने धुण्यात आले.हे स्वच्छता अभियान यापुढे निरंतर सुरू राहणार असून या मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी अधिकारी सहभागी होत असताना नागरिकांनी सुध्दा शहर स्वच्छते साठी पुढाकार घेत आपला कचरा विहित वेळेत योग्य ठिकाणी आणि घंटागाडीत जमा करावा,असे आवाहन आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.           

              या व्यतिरिक्त मनपा प्रभाग क्र.२ च्या कार्य क्षेत्रातील शहरातील अमजदिया मशीद ते गणेश सोसायटी प्रभाग समिती क्र.३ मधील आसबिबी मशीद ते मानसरोवर,प्रभाग समिती क्र.४ मधील गोल्डन हॉटेल ते भंडारी कंपाऊंड आणि प्रभाग समिती क्र.५ मधील तीनबत्ती ते पालिका मुख्यालय या रस्त्यादरम्यान सुध्दा सर्वंकष महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. महानगरपालिकेच्या नववर्षाच्या या अभियानाचे नागरिकांनी स्वागत केले असून हे अभियान मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागामार्फत  कायमस्वरूपी सुरु राहावे अशी अपेक्षा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *