भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी ग्रामनिधी व वित्त आयोग निधी अंतर्गत मोठ्या रक्कमेचा अपहार करणे, ३ लाखाच्या खुल्या निविदा करणे बंधनकारक असताना निविदा प्रक्रियेचा अवलंब न करणे तसेच खोटे धनादेश काढणे, मर्जीतल्या ठेकेदारांना काम देणे, धनादेश ठेकेदाराच्या नावाने देणे बंधनकारक असताना धनादेशाची रक्कम रोखीने काढणे व एक कोटींच्यावर बोगस पेमेंट करणे असा तक्रारी अर्ज तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य शाहनवाज इम्तियाज कुरेशी यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर भिवंडी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामविकास अधिकारी राम जगन्नाथ म्हस्के यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना म्हस्के यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना या आर्थिक अपहार प्रकरणी चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. चौकशी दरम्यान ग्रामविकास अधिकारी राम ज.म्हस्के गैरहजर राहणे, दफ्तर उपलब्ध करून न देणे, या मुळे त्यांनी जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा आणि गैरवर्तणूक करून कामात हलगर्जीपणा केल्याचा चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर झालेल्या सुनावणी नंतर ठाणे विधी लेखा कार्यालयाकडून लेख परीक्षण करण्यात आले. अखेर ग्रामविकास अधिकारी म्हस्के यांच्यावर गैरशिस्तीच्या वर्तनामुळे गैरकृत्याबाबत व कर्तव्यात कसूर असा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर कोकण विभागाचे सहाय्यक आयुक्त (चौकशी) यांनी सादर केलेल्या अहवालाअंती सर्व आरोप सिद्ध झाले. त्यानुसार स्थानिक निधी लेखा परिक्षा यांचेकडील गोपनीय रक्कम व आरोप पत्रात नमूद सन २०१७-२०१८ मधील १४ वा वित्त आयोग र.रू १६,७८.४४५/- व ग्रामनिधी र.रू १०,५५,३०२/- अशी एकूण रक्कम रूपये १,४०,३९,७३८/- इतक्या रक्कमेस राम जगन्नाथ म्हस्के हे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. वसुलपात्र रक्कम रूपये १,४०,३९,७३८/- पैकी अंतिम वसुल पात्र रक्कम निश्चित करुन सदर रक्कमेबाबत त्यांच्यावर बोजा चढविण्यांत येवून जप्तीची व कारवाई बाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश भिवंडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहे.

