भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वेहळे गावातील एका गोदामात अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याची घटना उघडकीस आली असून सामाजिक संस्थांच्या सक्रियतेमुळे सहाय्यक कामगार अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत गोदामात छापा टाकून ९ अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे.या प्रकरणी “स्मार्ट पॅकेजिंग सोल्युशन” चे मालक रामा राम सुतार याच्या विरोधात बालकामगार प्रतिबंध कायदा व इतर कलमांतर्गत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यातील वेहळे गावातील राजेश्वरी लॉजेस्टीक पार्क येथे गोदाम क्र.७२५ मधील गाळा क्र.१०७ ते ११० या ठिकाणी पहिल्या मजल्यावर इमारत नं .बी/५ या ठिकाणी “स्मार्ट पॅकेजिंग सोल्युशन” नावाने इलेक्ट्रिक सामानाची पॅकिंग करण्याचे काम चालते. या ठिकाणी अल्पवयीन मुलांमार्फत काम करून घेतले जात असल्याची माहिती समजल्याने आई फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा प्रमुख राजेश दत्ताराम दखिनकर व अखिल भारतीय सेना या सामाजिक संघटनांनी भिवंडी शहरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार सहा. आयुक्त व नारपोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल शुक्रवारी २० डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्या गोदामात छापा टाकून ९ बालकामगारांची सुटका केली. या घटनेने परिसरातील पॅकेजिंग प्रतिष्ठानांत व कामगारांमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुला-मुलींना सुरक्षितरित्या घरी पाठविले.तसेच पोलिसांनी आरोपी “स्मार्ट पॅकेजिंग सोल्युशन” मालक रामाराम सुतार याच्याविरुद्ध बालकामगार कायदा व इतर अनुषंगिक कलमान्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.तर आरोपींना लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

