भिवंडी : लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांच्या नावासमोर डिलीट लिहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे हजारो मतदारांना मतदान करता आलेले नाही. मात्र या बाबत स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती नसल्याने विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारांना मतदानाचा फटका बसणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आर्थिक सक्षम लोकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. असे लोक केवळ आर्थिक बळावर अपेक्षित पदे आपल्या पदरी पडून घेत समाजात मिरविताना दिसतात. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कामे माहिती नसलेले लोक राजकारणात आल्याने मतदारांना अपेक्षित कामे होत नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाची ओढ मतदारांमध्ये वाढलेली दिसते. या वर कहर म्हणजे निवडणूक आयोगाने आपल्या राष्ट्रीय कामात जोडलेल्या सुशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य कामे वेळीच न केल्याने मागील लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांना आपल्या नावापुढे डिलिट लिहिल्यामुळे मतदान करता आले नाही. या प्रकरणी वर्तमानपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र तत्कालीन निवडणूक कार्यालयाने मतदार नोंदणी करणाऱ्या बीएलओची कोणतीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. अथवा मतदारांनी देखील आपली नावे बीएलओ यांनी मतदार यादीत का नोंद केली नाहीत? अशा तक्रारी देखील केल्या नाहीत. दरम्यान अशा मतदाराने आपली नावे मतदार यादीमध्ये तपासून ती दुरुस्त केली असल्यास त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. वास्तविक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने या बाबत पुढाकार घेऊन मतदारांना मदत केली पाहिजे,अशी अपेक्षा असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांना मतदार यादीतील डिलीट नावाची माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काही उमेदवार अल्पमतांनी पराभूत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदार यादीतील डिलीट झालेल्या नावांबाबत भिवंडी पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, प्रत्येक मतदार संघाच्या कार्यालयात मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी आवाहन केले जाते. तसेच मतदार यादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये नावनोंदणी झाल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येते. त्यामुळे मतदारांनी जागृत राहून मतदार यादी नेहमी तपासली पाहिजे.

