भिवंडी,ता.२३ (वार्ताहर ) : श्री गीता जयंती निमित्ताने शहरातील श्री कालभैरव मंदिरात संपूर्ण गीतेचे पारायण संपन्न झाले. सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेली श्री कालभैरव मंदिर सेवा समिती व टिळक चौक मित्र मंडळाच्या श्रीकृष्ण भक्तांनी या आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला. जवळपास चाळीस भक्तांनी श्रीकृष्णाच्या अमृत वचनांचे पठण तथा श्रवण केले. हे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रा. रामदास पाटील सर, ह.भ.प. भोजने काका, समाजसेवक उमेश कोंडलेकर तसेच मामासाहेब भोजने यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच श्रीमद भगवत गीतेच्या ५१६८ व्या जयंती अर्थातच अष्टादस जयंती निमित्ताने भिवंडीत स्वामी श्री गंभीरानंद आश्रम यांच्या वतीने तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ भव्य ध्वज व कलश यात्रेचे आयोजन करून करण्यात आला. वऱ्हाळादेवी मंदिर ते ठाकराचा पाडा येथील स्वामी श्री गंभीरानंद आश्रम पर्यंत निघालेल्या या भव्य शोभायात्रेत शेकडोच्या संख्येने महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. तर शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फुर्त स्वागत केले.

